नागपूर येथे वेकोलीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक; शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी ठाम भूमिका
चंद्रपूर – वणी क्षेत्रातील गाडेगाव, खैरगाव, टाकळी, चिखली आणि सोनुर्ली या गावांतील शेतकऱ्यांची जमीन पैनगंगा प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आली असली, तरी खुल्या प्रवर्गातील काही शेतकऱ्यांच्या शिल्लक जमिनी अद्याप अधिग्रहण प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात पिकांचे नुकसान आणि आर्थिक-सामाजिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
या पार्श्वभूमीवर चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नागपूर येथे वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोली) चे व्यवस्थापकीय संचालक जयप्रकाश द्विवेदी यांच्याशी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या शिल्लक जमिनी तातडीने अधिग्रहित करण्याची ठाम मागणी केली.
या बैठकीस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे, वेकोलीचे निदेशक (कार्मिक) हेमंत पांडे, जी.एम. (आयआर), जी.एम. (भुराजस्व) आणि संबंधित शेतकरी उपस्थित होते.
खासदार धानोरकर यांनी यावेळी लेखी निवेदन सादर करत स्पष्ट केले की, वणी क्षेत्रातील उखणी खंड क्र.1 मधील जमिनी नीलजई डीप विस्तार प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात येत असून, याच पद्धतीने पैनगंगा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर वरील गावांतील उर्वरित शेतजमिनीही तात्काळ अधिग्रहित करण्यात याव्यात.
“स्थानिक शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यांना अन्यायाला सामोरे जावे लागू नये, यासाठी तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे,” असे धानोरकर यांनी ठामपणे सांगितले.
या बैठकीत वेकोली कामगारांच्या नियुक्त्या, स्थानिकांना रोजगाराची संधी आणि शैक्षणिक पात्रतेनुसार नेमणूक या विषयांवरही सविस्तर चर्चा झाली. वेकोलीच्या व्यवस्थापनाने याबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
खासदार धानोरकर यांच्या पुढाकारामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून, त्यांच्या या भुमिकेचे स्वागत केले जात आहे.