चंद्रपूर : करंजी व तुळाना गावांतील नागरिकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते करंजी व तुळाना येथे प्रत्येकी एक अत्याधुनिक वॉटर फिल्टर एटीएम मशीनचे लोकार्पण उत्साहात पार पडले. या उपक्रमामुळे दोन्ही गावांतील नागरिकांना परवडणाऱ्या दरात २४ तास शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
या लोकार्पण सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून राजू चिकटे (माजी सभापती, कृ.ऊं.बां. वरोरा), दिनेश कष्टी (संचालक, कृउ.बा. वरोरा), मनीषा ढेंगळे (सरपंच, तुळाना), राजू आसेकर, समर्थ बोढे, सविता काळे (सरपंच, करंजी), सुजीत कष्टी (उपसरपंच, करंजी), अभिमान काळे, गणेश मुसळे (पोलीस पाटील, करंजी), देविदास पा. कष्टी, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मगरे, बसंत सिंग, दराडे (शाखा अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा) यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विशेषतः महिलांना आणि लहान मुलांना दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळणार आहे. आरोग्यदृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या सुविधेमुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
कार्यक्रमादरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, “ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचविणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. करंजी व तुळाना येथे उभारण्यात आलेली वॉटर फिल्टर एटीएम सेवा हा त्या दिशेने टाकलेला महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”
या नव्या पायाभरणीमुळे ग्रामीण आरोग्याच्या दृष्टीने एक सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.




