Citizens of Amrai should not delete encroachment houses – Congress demands
घुग्घुस (चंद्रपुर) :
येथील अमराई वॉर्डातील नागरिकांना तहसील कार्यालयाकडून शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, हे नागरिक गेल्या 30-40 वर्षांपासून येथे वास्तव्यास असून सर्वसामान्य आणि गरीब आहेत. त्यामुळे त्यांच्या घरांवर कारवाई न करता त्यांना घरपट्टे देऊन घरे नियमबद्ध करावी, अशी मागणी घुग्घुस शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजुरेड्डी आणि सैय्यद अनवर यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रशासनाची नोटीस आणि नागरिकांमध्ये चिंता
मौजा घुग्घुस सर्वे क्र. 264 मधील 462 चौ. मीटर शासकीय जमिनीवर नागरिकांनी निवासी आणि व्यावसायिक अतिक्रमण केले आहे. यावर 06 मार्च रोजी तहसील कार्यालयाने न्यायालयीन आदेशाचा संदर्भ देत नागरिकांना सात दिवसांत घरे खाली करण्याची नोटीस बजावली. जर नागरिकांनी स्वतःहून घरे रिकामी केली नाहीत, तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार प्रशासन जबरदस्तीने अतिक्रमण काढणार असून त्याचा संपूर्ण खर्च नागरिकांकडून वसूल केला जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
काँग्रेसची प्रशासनाला विनंती
अमराई वॉर्डातील हे सर्व नागरिक अत्यंत गरीब असून गेल्या तीन-चार दशकांपासून येथे वास्तव्य करत आहेत. ते नियमितपणे ग्रामपंचायत व नगरपरिषदेचे कर भरतात, त्यामुळे त्यांना बेघर करणे अन्यायकारक ठरेल. त्यांच्यासाठी कोणतीही पर्यायी निवासी व्यवस्था नसल्याने प्रशासनाने अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी काँग्रेसची मागणी आहे.
शासनाने माणुसकीच्या दृष्टिकोनातून या प्रकरणाकडे पाहावे आणि घरपट्टे देऊन सदर घरे नियमबद्ध करावी, अशी काँग्रेसने विनंती केली.




