भंडारा : जिल्ह्यातील खमारी बुट्टी येथील रहिवासी कु. प्राची दुर्गा केशव चटप हिने आपल्या नेतृत्वगुणांच्या बळावर आणि संघाच्या अथक मेहनतीमुळे भारतीय महिला आट्यापाट्या संघाला विश्वविजेतेपद मिळवून दिले आहे. भारतीय आट्यापाट्या फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने झालेल्या आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताने सुवर्णकामगिरी करत विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे.
प्राची चटपच्या या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. तिच्या कठोर परिश्रमांमुळे आणि जिद्दीमुळे तिने हे स्वप्न साकारले. यासाठी तिने अनेक अडचणींवर मात केली, कठोर प्रशिक्षण घेतले आणि अपार मेहनत केली.
प्राची चटपचा हा प्रवास केवळ तिच्या वैयक्तिक यशापुरता मर्यादित नसून, तो संपूर्ण समाजासाठी आणि विशेषतः मुलींसाठी एक प्रेरणादायी संदेश आहे. ग्रामीण भागातील एक मुलगी आपल्या मेहनतीच्या जोरावर जागतिक स्तरावर कशी चमकू शकते, याचा हा उत्तम आदर्श आहे. तिच्या यशामुळे अनेक नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळेल आणि आट्यापाट्या खेळाला अधिक महत्त्व प्राप्त होईल.
भारतासाठी अभिमानास्पद ठरलेल्या या सुवर्णयशाबद्दल प्राची चटप आणि संपूर्ण भारतीय महिला आट्यापाट्या संघाचे मनःपूर्वक अभिनंदन!