वाचन संस्कृतीला बळकटी देण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक
नागपूर : “साहित्य संमेलन हे केवळ साहित्यप्रेमींचे जुळणारे मांदियाळी नसून, सक्षम, समर्थ आणि कल्पक समाजाच्या निर्मितीसाठी एक भांडवली गुंतवणूक आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित साहित्यिक संवादात ते बोलत होते.
डॉ. जोशी म्हणाले की, वाचन हे केवळ वैयक्तिक समाधानाचे साधन नसून, ते सामाजिक आणि मानसिक विकासाचा महत्त्वाचा घटक आहे. वाचनामुळे भाषिक समृद्धी वाढते, कल्पनाशक्तीला चालना मिळते आणि समाज अधिक सहिष्णू, विवेकी आणि सृजनशील होतो. त्यामुळे साहित्य संमेलनासाठी होणारा आर्थिक खर्च हा समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेला एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक आहे.
युवकांना वाचन संस्कृतीकडे वळविण्याची गरज
आजच्या पिढीला वाचनाची गोडी लागावी यासाठी बालपणापासूनच वाचन संस्कृती रुजविणे गरजेचे आहे. “आजच्या तरुणांकडे विचारशक्ती आहे, ते अभिव्यक्तीक्षम आहेत, परंतु वाचनाच्या सवयीपासून ते दूर जात आहेत. त्यामुळे शालेय जीवनापासूनच वाचनाची आवड निर्माण करणे अत्यावश्यक आहे,” असे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक वाचनालये आणि साहित्य संस्था यांचा सक्रिय सहभाग आवश्यक
कधीकाळी महाराष्ट्रातील सार्वजनिक वाचनालयांनी व्यापक चळवळ उभी केली होती, मात्र आज ती चळवळ गारठली आहे. राज्यात जवळपास 12,500 सार्वजनिक ग्रंथालये कार्यरत असली, तरी ती पूर्वीइतकी प्रभावी नाहीत. ही वाचनालये, साहित्य संस्था आणि शासनाने एकत्रित येऊन वाचन संस्कृतीला पुन्हा बळकटी देण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वाचन संस्कृती आणि भाषिक विकासाला चालना देण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.




