मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंबईतील ऐतिहासिक केनेसेथ इलियाहू सिनेगॉग येथे दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या ज्यू वंशविच्छेदात बळी पडलेल्या लाखो ज्यू नागरिकांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण केली. जागतिक वांशिक नरसंहार स्मृती दिनानिमित्त जेकब ससून ट्रस्टच्या वतीने आयोजित या विशेष स्मृतिसभेत राज्यपाल उपस्थित होते.
या प्रसंगी, राज्यपालांनी ज्यू समुदायाच्या ऐतिहासिक संघर्षांची व दुःखद आठवणींना उजाळा दिला. त्यांनी वंशविच्छेदाच्या घटनांतून मिळणाऱ्या शहाणपणावर जोर देत वांशिक सलोख्याचे महत्त्व अधोरेखित केले.
सिनेगॉगमध्ये उपस्थित असलेल्या ज्यू समुदायातील प्रतिनिधींनीही या स्मृतिसभेत सहभाग घेतला व नरसंहारातील बळींना आदरांजली अर्पण केली. हा दिवस ज्यू समुदायासाठी केवळ दु:खद आठवणींचा नाही तर मानवतेच्या एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
स्मृतिसभेत राज्यपालांनी विविध धर्म आणि वांशिक समुदायांमधील संवाद व सलोखा वाढविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.




