नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात आयोजित ‘जस्टा कॉझा’ या राष्ट्रीय विधी उत्सवाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात राज्यसभेचे माजी खासदार आणि दिल्लीच्या मोतीलाल नेहरू महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. राकेश सिन्हा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. सिन्हा यांनी आपल्या भाषणात विचार मंथन आणि मानवी मूल्यांचा महत्त्वपूर्ण आधार स्पष्ट केला. त्यांनी सांगितले की, भारताला वादविवाद, संवाद, आणि चर्चा यांचा समृद्ध वारसा लाभला आहे. याचे उदाहरण देत त्यांनी आर्य समाजाचे स्वामी दयानंद सरस्वती यांनी १८६९ मध्ये काशी येथे ३०० विद्वानांसोबत केलेल्या वादविवादाचा तसेच शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्यातील ऐतिहासिक संवादाचा उल्लेख केला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. राजेंद्र काकडे यांनी भूषविले. संध्याकाळी कार्यक्रमाच्या अधिकृत उद्घाटनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे उपस्थित होते. ‘जस्टा कॉझा’ उत्सव 19 जानेवारीपर्यंत चालणार असून यात विविध स्पर्धा आणि चर्चासत्रे होणार आहेत.




