गडचांदूर (चंद्रपूर) : परभणी येथे संविधान शिल्पाची तोडफोडीच्या घटनेनंतर उसळलेल्या दंगलीत काही भीमसैनिकांना अटक करून न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली. या दरम्यान, पोलिस कोठडीत असताना सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या आंबेडकरवादी युवकाचा मृत्यू झाला. या अमानवीय घटनेमुळे आंबेडकरी चळवळीतील संताप उफाळून आला आहे.
गडचांदूर येथे या घटनेच्या निषेधार्थ २० डिसेंबर रोजी संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य कॅण्डल मार्च काढण्यात आला. या मार्चद्वारे सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
कॅण्डल मार्चची मिरवणूक
मार्चची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनाने झाली. मिरवणूक सिद्धार्थ विहार मार्गे संविधान चौक आणि बस स्थानक मार्गे पुढे जात बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ पोहोचली, जिथे त्याचा समारोप करण्यात आला.
नेत्यांची प्रतिक्रिया आणि मागण्या
कार्यक्रमादरम्यान सामाजिक चळवळीचे नेते प्रा.डॉ. हेमचंद दूधगवळी यांनी परभणी येथे घडलेल्या घटनेचे सविस्तर वर्णन करत पोलिसांच्या अमानुष वर्तनाचा निषेध केला.
या घटनेबाबत सरकारकडून त्वरीत कारवाईची मागणी करण्यात आली.
मुख्य मागण्या:
शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला १ कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी.
कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे.
जबाबदार पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
महिला व भीमसैनिकांचा मोठा सहभाग
मार्चमध्ये महिलांसह भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. विविध सामाजिक नेत्यांनी शासनाचा तीव्र निषेध नोंदवत आपल्या मनोगतातून घटनेचा पर्दाफाश केला.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.प्रशांत खैरे यांनी केले, तर शेवटी बुद्ध वंदनेने शांततेच्या वातावरणात कॅण्डल मार्चची सांगता झाली.




