वरोरा (चंद्रपूर) : आनंद निकेतन महाविद्यालयात स्व.इंदिराबाई जनार्दनपंत देशपांडे स्मृती आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा २३ फेब्रुवारी २०२४ रोजी पार पडली. भारतातील वाढते खाजगीकरण देशाच्या हिताचे ठरेल काय? होय/नाही हा या स्पर्धेचा विषय होता. या स्पर्धेत स्व.सुशीलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालयाचा प्रेम जरपोतवार याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. आनंद निकेतन महाविद्यालयाचा मयूर हणवते याने द्वितीय, तर सरदार पटेल महाविद्यालयातील प्रलय मशाखेत्री याने तिसरा क्रमांक प्राप्त केला. उत्तेजनार्थ पारितोषिक श्रुती मोहितकर, सुरज चापले यांना देण्यात आले. फिरता चषक सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालयास मिळाला. सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देत मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.मृणाल काळे हे होते. परीक्षक म्हणून प्रा.डॉ.दिलीप चौधरी, डॉ.रवींद्र शेंडे, डॉ.श्रीकांत साव यांनी काम पाहिले. तिन्ही परीक्षकांनी आपले विचार याप्रसंगी व्यक्त केले. विषयाचे आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे मांडलेल्या मतांचे कौतुक केले.
वादविवाद स्पर्धेत प्रथम पारितोषिक आणि फिरता चषक मिळविल्याबद्दल सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.जयश्री कापसे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.ममता ठाकुरवार, प्रा.संतोष आडे तसेच प्राध्यापक वृंदांनी प्रेम जरपोतवार व सुरज चापले यांचे अभिनंदन केले आहे.




