चंद्रपूर : राज्य शासनाच्या प्लास्टिक कचरा निर्मूलन अभियानांतर्गत पंचायत समिती भद्रावतीच्या वतीने ग्रामपंचायत पारोधी येथे “प्लास्टिक कचरा संकलन – एक दिवस श्रमदान” या तालुकास्तरीय मोहिमेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
या अभियानाचे नेतृत्व पंचायत समिती भद्रावतीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ. बंडू आकुनरवार उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत परिसरासह गावातील सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक कचरा संकलन करून व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
उपस्थित नागरिकांना एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्याचे, पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्याचे आणि प्लास्टिकमुक्त गाव उभारण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाला गणेश उमरे (ग्रामपंचायत अधिकारी), नागपुरे मॅडम (उमेद विभाग), बचत गटातील महिला, आशा सेविका, शिक्षक, विद्यार्थी, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच बीआरसी श्रीराम थूल यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान सर्व उपस्थितांनी श्रमदानात उत्स्फूर्त सहभाग घेत प्लास्टिकमुक्त व स्वच्छ गाव घडविण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण झाली असून, भविष्यातही अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.




