चंद्रपूर – इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये शाळा, तालुका, जिल्हा अथवा विभाग पातळीवर प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेंतर्गत अनुक्रमे 5 हजार, 10 हजार, 25 हजार व 50 हजार रुपयांचे आर्थिक पारितोषिक दिले जाते. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर कार्यालयाकडे तात्काळ प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.
प्रस्तावासोबत विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र, गुणपत्रिका, बँक पासबुकची झेरॉक्स, आधार कार्ड व शिक्षण संस्थेचा टी.सी. (शाळा सोडल्याचा दाखला) जोडणे आवश्यक आहे.
संबंधित संस्था वेळेत प्रस्ताव सादर न केल्यास, पात्र विद्यार्थी पुरस्कारापासून वंचित राहू शकतात. अशा स्थितीत संपूर्ण जबाबदारी संबंधित संस्थेचे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची राहील, असे स्पष्ट करत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभागाचे विनोद मोहतुरे यांनी या बाबीची गांभीर्याने नोंद घेण्याचे आवाहन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या हक्काचा लाभ सुनिश्चित करण्यासाठी प्रस्ताव त्वरीत सादर करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.




