नागपूर — नागपूर रेल्वे विभागात ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत 15 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास झपाट्याने सुरू असून, येत्या काळात प्रवाशांना अधिक सुसज्ज, स्वच्छ आणि आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त स्थानकांचा अनुभव मिळणार आहे.
या योजनेत घोडाडोंगरी, बैतूल, आमला, जुन्नारदेव, मुलताई, काटोल, नरखेड, पांढुर्णा, गोंधणी, सेवाग्राम, धामणगाव, पुलगाव, हिंगणघाट, चंद्रपूर आणि बल्लारशाह या 15 स्थानकांचा समावेश आहे.
भारतीय रेल्वेची दूरदृष्टी असलेल्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेचा उद्देश देशभरातील रेल्वे स्थानकांचा टप्प्याटप्प्याने आणि गरजेनुसार सर्वांगीण विकास करणे हा आहे. यामध्ये प्रवाशांच्या गरजा केंद्रस्थानी ठेवून सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे.
पुनर्विकासाच्या कामांमध्ये 12 मीटर रुंद फुट ओव्हर ब्रिजेस (लिफ्टसह), वाढवलेला सर्क्युलेटिंग एरिया व पार्किंगची क्षमता, प्लॅटफॉर्मवर छतांची उभारणी, आकर्षक पोर्चसह प्रवेश व निर्गम दरवाजे, सुधारित दिशादर्शक फलक, आधुनिक प्रकाशयोजना आणि आरामदायक बसण्याची व्यवस्था यांचा समावेश आहे.
या योजनांमुळे स्थानकांची रचना प्रवासी अनुकूल, सर्वसमावेशक व भविष्यातील गरजांसाठी सक्षम होणार असून, नागपूर विभागातील रेल्वे अनुभवात आमूलाग्र बदल अपेक्षित आहे.




