नागपुरातील महाल परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमध्ये शनिवारी काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी नव्या आदेशानुसार पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी हटवली आहे, तर तणाव कायम असल्याने यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
याशिवाय, कोतवाली, तहसील आणि गणेशपेठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत तीन तासांची शिथिलता देण्यात आली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत प्रशासन सतर्क राहणार आहे.
पोलीस आयुक्तांनी सांगितले की, शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.




