महाराष्ट्र : महाराष्ट्राने देशातील इतर राज्यांना मागे टाकत सोयाबीन खरेदीत सर्वोच्च स्थान पटकावले आहे. राज्यातील 7,64,731 नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी 3,69,114 शेतकऱ्यांकडून 7,81,447 मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे.
ही खरेदी देशातील मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात आणि तेलंगणासारख्या प्रमुख राज्यांपेक्षा अधिक आहे, असे राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. या यशामुळे महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण उदाहरण ठरले असून, त्यांच्या मेहनतीचा हा मोठा सन्मान आहे.
सोयाबीन खरेदीतील हा विक्रम कृषी क्षेत्रात महाराष्ट्राच्या पुढाकाराची साक्ष देतो. शेतकऱ्यांना अधिक आधार मिळावा आणि कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडावा, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचेही रावल यांनी नमूद केले.




