Thursday, July 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

रस्ते अपघातात मदत करणाऱ्याला मिळणार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र – जिल्हाधिकारी अमोल येडगे

रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करा ; “रोड सेफ्टी हिरो” बना

हेल्मेटचा वापर करा, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे टाळा, चारचाकी वाहनात सीट बेल्ट लावा, वेगावर नियंत्रण ठेवा आणि रस्ता सुरक्षेचा संकल्प करा..

कोल्हापूर : रस्त्यावरील अपघातात वेळेत मदत मिळाल्यास व्यक्तीचा जीव वाचू शकतो. यासाठी रस्त्यावरील अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने दवाखान्यात नेऊन वैद्यकीय उपचार मिळवून देणाऱ्या व्यक्तीला जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येईल, असे प्रतिपादन करुन “रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करा आणि “रोड सेफ्टी हिरो” बना, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर व डॉ.डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग व पॉलीटेक्नीक कॉलेज, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षा विषयी जनजागृती कार्यक्रम जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. महादेव नरके, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.संतोष चेडे, रजिस्ट्रार लितेश मालदे, प्रा.मकरंद काईंगडे, डॉ.पी.के.शिंदे, प्रा.नितीन माळी, प्रा.आर.जी. बेन्नी तसेच देशभर पदभ्रमंती द्वारे रस्ता सुरक्षेचा संदेश देणारे अवध बिहारी लाल, जितेंद्र प्रताप, महेंद्र प्रताप आणि गोविंदा नंद यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, रस्ता सुरक्षेबाबत आपल्या प्रत्येकाला माहिती असते, पण आपण वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करतो. रस्ते अपघातामुळे अनेकांना जीव गमवावा लागत असून रस्ता सुरक्षेत हयगय ही न सुधारता येणारी चूक ठरते. यासाठी रस्ता सुरक्षेच्या नियमांची माहिती घेण्याबरोबरच या नियमांचे प्रत्येकाने पालन करायला हवे. हेल्मेटचा वापर करुया.. गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे टाळूया.. चारचाकी वाहनात सीट बेल्ट लावूया. वेगावर नियंत्रण ठेवूया.. आणि वाहतुकीचे नियम पाळून रस्ता सुरक्षेचा संकल्प करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. म्हणाले, रस्त्यावरील अपघातांमध्ये मृत्यू होण्यात 18 ते 35 वयोगटातील युवकांचे प्रमाण जास्त आहे. हेल्मेट न वापरणे, वेगाने वाहन चालवणे, समोरुन येणाऱ्या वाहनाचा प्रकाश, सीट बेल्ट न वापरणे, व्यसन अथवा अंमली पदार्थांचे सेवन करुन गाडी चालवणे अशा कारणांमुळे अपघाती मृत्यू वाढत आहेत. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. रस्त्यावर अपघात झाल्यावर वेळेत मदत न मिळू शकल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अपघातग्रस्ताला “गोल्डन हावर” मध्ये मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सध्या दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या वाढत असून रस्त्यावरील अपघातांचे प्रमाणही वाढत आहेत, असे सांगून अपघात होण्याची कारणे व ते रोखण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले.

स्वागत प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी तर सूत्रसंचालन प्रा.राज अलास्कर यांनी केले.
यावेळी डॉ.डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक आणि इंजीनियरिंग कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News