(प्रणयकुमार बंडी)
घुग्घुस, चंद्रपुर | धोबी परीट जनकल्याण संस्था, घुग्घुस यांच्या वतीने कर्मयोगी, समाजसुधारक श्री संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंती महोत्सवाचे आयोजन दिनांक २३ व २४ फेब्रुवारी २०२६ (सोमवार व मंगळवार) रोजी करण्यात आले आहे. हा भव्य सामाजिक-धार्मिक महोत्सव संत गाडगे महाराज स्मारक भवन, वार्ड क्रमांक ०६, जनता कॉलेज रोड, घुग्घुस येथे संपन्न होणार आहे.
संत गाडगे महाराजांनी समाजाला दिलेला दशसूत्री संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे—
भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या-नागड्यांना वस्त्र, गरीब मुला-मुलींना शिक्षणासाठी मदत, बेघरांना आसरा, अंध-पंगु व आजारी व्यक्तींना उपचार, बेकारांना रोजगार, पशु-पक्षी व मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणींचे विवाहकार्य आणि दुःखी-निराशांना धीर देणे—हाच खरा “रोकडा धर्म” असल्याचा संदेश त्यांनी दिला.
याच विचारांच्या प्रेरणेने, संत गाडगे महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजसुधारणेचा विडा उचलण्यासाठी संपूर्ण समाज एकत्र येत आहे. वैराग्यमूर्ती बाबांची दीडशेव्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम सार्वजनिक स्वरूपात, सर्वांच्या सहकार्याने साजरा करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य जाहीर प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार व सप्तखंजिरी वादक कुमारी क्रांती काळे, साखरी, तालुका अंजनगाव (खुर्जी), जिल्हा अमरावती, आपल्या प्रभावी वाणीने आणि लोककलेच्या माध्यमातून संत गाडगे महाराजांचे विचार जनमानसात पोहोचवणार आहेत.
या महोत्सवाच्या माध्यमातून समाजात सेवा, समता, करुणा आणि आत्मनिर्भरतेचे मूल्य अधिक बळकट व्हावे, हा उद्देश आहे. तरी या पवित्र कार्याच्या किरणाला उजाळा देण्यासाठी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन धोबी परीट जनकल्याण संस्था, घुग्घुस यांनी केले आहे.




