नागपूर : मध्य नागपुरातील सर्वात जुन्या एम्प्रेस मिल परिसरातील मारवाडी चाळ शेजारील ऐतिहासिक शिकस्त भिंत काल रात्री ११.३० वाजताच्या सुमारास अचानक कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, भिंतीच्या मलब्याखाली चार चारचाकी वाहने दाबली गेल्याने ती गंभीरपणे नुकसानग्रस्त झाली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी तसेच पोलिस व मनपा कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कोसळलेला मलबा हटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी सकाळी घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी संबंधित विद्यमान मालकाला तातडीने नोटीस बजावण्याचे निर्देश दिले असून, अशा धोकादायक जुन्या संरचनांची तपासणी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
या दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मनपा प्रशासनाकडून अधिक दक्षता घेण्याची मागणी केली जात आहे.





