चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आज नझूल धारकांना कायमस्वरूपी घरपट्टे देण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीला किशोर जोर्गेवार उपस्थित होते.
चंद्रपूर आणि घुग्घुस येथील नझूल धारकांना कायमस्वरूपी घरपट्टे देण्याची प्रक्रिया वेगाने राबविण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच मंत्रालयात बैठक घेऊन आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या.
यामध्ये सर्वेक्षणाची प्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. तसेच नवीन नियुक्त एजन्सींनी ठरविलेल्या वेळेत काम पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाने या संपूर्ण प्रक्रियेवर सातत्याने देखरेख ठेवावी, सर्वेक्षण पारदर्शक राहावे आणि प्रत्येक पात्र लाभार्थ्याला न्याय मिळावा, यासाठी निर्देश देण्यात आले.
बैठकीदरम्यान इतरही महत्त्वाच्या सूचनांची देवाणघेवाण करण्यात आली असून लवकरच कायमस्वरूपी घरपट्ट्यांच्या वितरणाला गती मिळणार आहे.





