पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांच्यातर्फे प्रशस्तीपत्र प्रदान; सर्वधर्मीय महाआरती व शिस्तबद्ध उत्सवाचा गौरव
घुग्घुस, चंद्रपुर : सामाजिक सलोखा, शांतता, उत्तम शिस्त आणि राष्ट्रीय एकात्मतेचा नवा आदर्श निर्माण करणाऱ्या घुग्घुसच्या जय श्रीराम गणेश मंडळाचा चंद्रपूर जिल्हा पोलिस दलातर्फे विशेष गौरव करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक कार्यालय, चंद्रपूर यांच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव व विसर्जन सोहळ्यात उत्कृष्ट कायदा-सुव्यवस्था राखल्याबद्दल आणि सामाजिक सलोख्याचे पायंडे पाडल्याबद्दल मंडळाला मानाचे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी (भा.पो.से.) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मंडळाला, सार्वजनिक गणेशोत्सव व विसर्जन सोहळ्यात उत्सवाचे पावित्र्य जपत, सामाजिक भान राखून आणि शिस्तबद्ध मिरवणूक काढून सर्व नियमांचे चोख पालन केले.
मंडप सुरक्षेचे नियम, सीसीटीव्ही यंत्रणा, स्वयंसेवकांची नेमणूक तसेच वेळेचे बंधन पाळून पोलिस प्रशासनास पूर्ण सहकार्य केले. गणेशोत्सव काळात आणि विसर्जन मिरवणुकीत पोलिस प्रशासनाने दिलेल्या सर्व अटी, नियम व सुरक्षेच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून, शांतता व सुव्यवस्था राखण्यात मोलाचे योगदान दिले तसेच कोणतीही अनुचित घटना न घडू देता उत्सव अतिशय आदर्शवत पार पाडला. या सर्व बाबींबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
विशेष म्हणजे, हे गणेश मंडळ मागील सलग दहा वर्षांपासून आ. देवराव भोंगळे यांच्या संकल्पनेतून माजी मंत्री व आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सर्वधर्म समभाव महाआरतीचे अखंड आयोजन करत आहे. या सोहळ्यात हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई आणि बौद्ध समाजातील नागरिक मोठ्या उत्साहात एकत्र येऊन महाआरती करतात.

याद्वारे शिस्त, पर्यावरणीय संतुलन, सामाजिक सौहार्द व सांस्कृतिक ऐक्याचा संदेश दिला जातो. यावर्षीची मिरवणूक सुद्धा अत्यंत शिस्तबद्ध पार पडली असून, केरळचा गजराज, पंजाबची झाकी अशा कलात्मक व आकर्षक सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
प्रशासनाकडून मिळालेल्या या सन्मानामुळे घुग्घुस शहरात आणि नागरिकात आनंद व्यक्त होत असून, मंडळाच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली आहे.
यावेळी नगरसेवक विवेक बोढे, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री अमोल थेरे, मंडळाचे अध्यक्ष सुनील बाम, धनराज पारखी, सुरेंद्र जोगी, उमेश दडमल, गणेश कुटेमाटे, हसन शेख, मोमीन शेख,असगर खान, कोमल ठाकरे, किशोर जाधव, सचिन गोखरे आदी उपस्थित होते.




