Tuesday, October 6, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

फसवणूक प्रकरणातील पाहिजे आरोपी नोएडातून ताब्यात

वर्धा शहर पोलिसांची सात दिवसांची शोधमोहीम; विविध ठिकाणी फिरत असलेल्या आरोपीचा शिताफीने माग काढला

प्रणयकुमार बंडी

वर्धा : शेतकरी व व्यापाऱ्यांना शेतीमाल तसेच बियाणे खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध परवाने व डिस्ट्रिब्युटरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पाहिजे असलेल्या आरोपीला वर्धा शहर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील नोएडा येथून ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे.

पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी कलम 420, 34 भादंवि या गुन्ह्यात जसवंत (वय 39 वर्षे), रा. तमेरी, ता. जसवंतनगर, जि. इटावा, उत्तर प्रदेश हा आरोपी पाहिजे होता.

सदर आरोपी शेतकरी व व्यापाऱ्यांना विविध परवाने तसेच डिस्ट्रिब्युटरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवत होता. संबंधित व्यवसायातून मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून आर्थिक रक्कम घेत फसवणूक केल्याचा आरोप आहे.

आरोपीचा शोध घेण्यासाठी यापूर्वी चार वेळा पोलिसांची पथके तयार करून विविध ठिकाणी शोध घेण्यात आला होता. मात्र आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. त्यानंतर पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर यांनी वर्धा शहर पोलिसांचे विशेष पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

विशेष पथकाने उत्तर प्रदेश आणि दिल्ली परिसरात सलग सात दिवस शोधमोहीम राबविली. दिल्ली, नोएडा तसेच आरोपीचे मूळ गाव तमेरी, जसवंतनगर, रजमउ, बैदपूरा आदी संभाव्य ठिकाणी जाऊन माहिती संकलित करण्यात आली. आरोपी पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी वारंवार ठिकाणे बदलत असल्याचे तपासात समोर आले. मात्र पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे त्याच्या हालचालींचा माग काढत अखेर सेक्टर क्रमांक 168, नोएडा, उत्तर प्रदेश येथून त्याला ताब्यात घेतले.

त्यानंतर आरोपीला स्थानिक न्यायालयासमोर हजर करून आवश्यक ट्रान्झिट वॉरंट प्राप्त करण्यात आले. त्यानंतर त्याला वर्धा शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाही व तपास सुरू आहे.

दरम्यान, तपासादरम्यान आरोपीविरुद्ध वर्धा शहर, हिंगणघाट तसेच राजुरा, जि. चंद्रपूर येथील काही प्रकरणांमध्ये नॉन-बेलेबल वॉरंट (NBW) प्रलंबित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. महाराष्ट्रातील इतर पोलीस ठाण्यांमध्येही आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल आहेत का किंवा न्यायालयीन नॉन-बेलेबल वॉरंट प्रलंबित आहेत का, याची संबंधित पोलीस ठाण्यांकडून माहिती घेऊन पडताळणी सुरू आहे.

आरोपी अन्य कोणत्याही गुन्ह्यात पाहिजे असल्यास संबंधित पोलीस ठाण्यांना आवश्यक माहिती देऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

कारवाईत गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, घनशाम जाधव, पोलीस हवालदार महेंद्र पाटील, अभिजित वाघमारे, पोलीस अंमलदार रंजीत भुरसे, अमोल साळवन तसेच सायबर सेलचे पोलीस हवालदार अक्षय राउत यांनी सहभाग घेतला.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News