चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित ‘चांदा ज्योती सुपर 100’ प्रवेश परीक्षा 25 जुलै 2025 रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा 10 वी व 11 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला चालना देणारा हा उपक्रम आहे.
परीक्षेची वेळ व महत्त्वाच्या सूचना
10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची वेळ दुपारी 12 ते 2.30 पर्यंत असून, 11 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत असेल. सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःच्या तालुक्यातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षेस येताना मूळ आधार कार्ड व त्याची झेरॉक्स प्रत, तसेच काळ्या शाईचा बॉलपेन (Black Ball Pen) आणणे बंधनकारक आहे.
प्रमुख परीक्षा केंद्रांची यादी खालीलप्रमाणे :
विश्व शांती विद्यालय, सावली. सावित्रीबाई फुले विद्यालय, गडचांदूर. जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, राजुरा. नवभारत विद्यालय, मूल. नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय, ब्रह्मपुरी. पीएम श्री जि.प. उच्च प्राथमिक शाळा, वरोरा. थापर हायस्कूल, बल्लारपूर. लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय, भद्रावती. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, जीवती. कर्मवीर विद्यालय, नागभीड. जनता विद्यालय, पोंभुर्णा. स्व. लक्ष्मणराव कुंदोजवार ज्युनिअर कॉलेज, गोंडपिपरी. सर्वोदय विद्यालय, सिंदेवाही. विद्या विहार कॉन्व्हेंट हायस्कूल, तुकूम, चंद्रपूर. न्यू राष्ट्रीय विद्यालय, चिमूर.
अभ्यासक्रम व परीक्षा पद्धत
10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमात विज्ञान, गणित, सामान्य ज्ञान आणि इंग्रजी विषयांचा समावेश असून, तो इयत्ता 10 वी राज्य मंडळावर आधारित असेल.
11 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित असून, हा अभ्यासक्रम देखील इयत्ता 10 वी राज्य मंडळावर आधारित असेल.
परीक्षा बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेच्या (MCQ) स्वरूपात एकाच सत्रात घेतली जाईल.
प्रवेश परीक्षेबाबत अधिक माहिती https://zpchandrapur.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, विद्यार्थ्यांनी व पालकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा परिषद चंद्रपूरच्या प्राथमिक शिक्षण विभागाशी किंवा संबंधित तालुका शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी कळविले आहे.





