चांदाफोर्ट अमृत स्टेशनचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत संपन्न
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील चांदाफोर्ट स्टेशन आता ‘अमृत भारत स्टेशन योजना’अंतर्गत आधुनिकतेच्या नव्या उंबरठ्यावर! आज या नव्याने विकसित केलेल्या चांदाफोर्ट अमृत स्टेशनचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले. या प्रसंगी चंद्रपूरच्या लोकप्रतिनिधी खासदार प्रतिभा धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार धानोरकर यांनी या वेळी बोलताना सांगितले की, “रेल्वे ही केवळ प्रवासाचे माध्यम नसून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा दुवा आहे. नागरिकांच्या सुरक्षित, सुलभ व आधुनिक प्रवासासाठी उभारण्यात आलेले हे स्थानक चंद्रपूरच्या प्रगतीचा नवा अध्याय ठरेल. आम्ही हा दुवा अधिक बळकट करण्यासाठी कटिबद्ध आहोत.”
या लोकार्पण सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय विधी व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला.
स्थानिक पातळीवरील मान्यवरांमध्ये आमदार किशोर जोरगेवार, रेल्वे विभागातील अधिकारी बी.व्ही.एस. सुब्रमण्यम, एस.एन. नामदेव, स्वातंत्र्यसैनिक डॉ. शेषराव इंगोले आणि काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
चांदाफोर्ट स्टेशनच्या पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यात एकूण १९.३ कोटी रुपये खर्चून अनेक आधुनिक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये नवीन स्टेशन इमारत, विस्तृत फिरणारे क्षेत्र, प्लॅटफॉर्म निवारा व पृष्ठभाग, १२ मीटर रुंदीचा फूट ओव्हर ब्रिज, नव्याने बांधलेले रॅम्प आणि स्पर्शिक मार्ग यांचा समावेश आहे.
या आधुनिक सुविधांमुळे चंद्रपूरकरांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि आरामदायक रेल्वे प्रवास अनुभवता येणार आहे. शिवाय, या विकासामुळे जिल्ह्याच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला.




