विदर्भात उद्या अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे.
याशिवाय, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आजदेखील भंडारा आणि गोंदिया वगळता विदर्भाच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. नागपुरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.
दरम्यान, चंद्रपूर येथे आज कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर नागपुरात 39.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वाढत्या तापमानासोबतच आगामी पावसामुळे हवामानातील अनिश्चिततेमुळे नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.




