गोंदिया — जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.
या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. रेलटोली येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनापासून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा नेण्यात आला.
मोर्चामध्ये पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात निषेधाचे फलक घेत आणि “दहशतवादाचा निषेध असो”, “निष्पाप पर्यटकांना न्याय द्या” अशा घोषणा देत शांततेत हा मोर्चा पार पडला.
या वेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केंद्र सरकारकडून कठोर पावले उचलण्याची मागणी केली तसेच देशातील सुरक्षेच्या दृष्टीने ठोस धोरण आखण्याचे आवाहन केले.
दहशतवादाचा निषेध करत, हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.