मुंबई : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा देशातील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून, येथे दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. मात्र, चंद्रपूर शहरातून थेट ताडोबा सफारीसाठी कोणतीही सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध नसल्याने स्थानिक आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, चंद्रपूर शहरातून थेट ताडोबा मोहर्ली सफारी गेटपर्यंत क्रुझर सेवा सुरू करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
मुंबई मंत्रालयात वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आमदार जोरगेवार यांनी ही मागणी मांडली. ते म्हणाले की, सध्या पर्यटकांना मोहर्ली गेटपर्यंत पोहोचण्यासाठी खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते, त्यामुळे वेळ आणि पैशाचा अपव्यय होतो. क्रुझर सेवा सुरू केल्यास स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना मोठी सुविधा मिळेल आणि पर्यटनाला चालना मिळेल.
पर्यटन शुल्क आणि बुकिंगसंदर्भातील मागण्या ताडोबा सफारीसाठी शनिवार आणि रविवारसाठी वाढीव शुल्क आकारले जाते, जे सर्वसामान्य पर्यटकांसाठी अडचणीचे ठरते. हे शुल्क पूर्णपणे रद्द करून आठवडाभर समान शुल्क ठेवण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच, बुकिंग करूनही काही पर्यटक न आल्यास त्यांच्या जागी अन्य पर्यटकांना संधी मिळावी, यासाठी बुकिंग बदलण्याची मुभा देण्यात यावी, असेही ते म्हणाले. चैत्र नवरात्र आणि श्री माता महाकाली महोत्सवाच्या काळात ताडोबा सफारीसाठी विशेष बससेवा सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली.
गोंडकालीन किल्ल्याची लघुप्रतिकृती आणि काष्ठशिल्प प्रदर्शनाची मागणी चंद्रपूरच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा देण्यासाठी गोंडकालीन किल्ल्याची 40×40 फूट लांबीची लघुप्रतिकृती तयार करण्यात आली आहे. ही प्रतिकृती मोहर्ली सफारी गेटजवळ उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी जोरगेवार यांनी केली. तसेच, दिवंगत काष्ठशिल्पकार मनोहर सप्रे यांच्या बांबू व लाकडाच्या शिल्पकलेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, यासाठी मोहर्ली सफारी गेट येथे कायमस्वरूपी प्रदर्शनी दालन स्थापन करण्याचीही त्यांनी विनंती केली.
चंद्रपूरच्या पर्यटनविकासाला चालना मिळावी आणि ऐतिहासिक वारसा जतन व्हावा, यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. या बैठकीला वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.




