वाशिम जिल्हा पोलीस दलाला सुरक्षा व्यवस्थेसाठी एक नवी आणि अत्याधुनिक सर्व्हेलंस व्हॅन मिळाली आहे. या व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे, थर्मल इमेजिंग कॅमेरे आणि जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. ही व्हॅन विशेषतः गर्दीच्या आणि संवेदनशील ठिकाणी नजर ठेवण्यासाठी तसेच गुन्हेगारी तपासासाठी उपयोगी ठरणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे आणि अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे या वाहनाच्या कार्यप्रणालीची माहिती घेतली. सभास्थळे, आंदोलने, तसेच महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी या व्हॅनचा उपयोग केला जाणार आहे.
कशी कार्य करते सर्व्हेलंस व्हॅन?
या वाहनात अत्याधुनिक सीसीटीव्ही आणि थर्मल इमेजिंग कॅमेरे असल्यामुळे रात्रीच्या वेळीही स्पष्ट दृश्य मिळू शकते.
ड्रोन कॅमेरे वापरून मोठ्या परिसरावर लक्ष ठेवता येईल.
घटनास्थळाचे चित्रीकरण करून तपासासाठी उपयुक्त माहिती लगेच उपलब्ध करता येईल.
संशयित व्यक्ती ओळखण्यास आणि बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यास मदत होणार आहे.
गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी ही व्हॅन पोलीस दलासाठी मोठी मदत ठरणार आहे.