धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथे पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू आणि गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. कारवाईदरम्यान एका वाहनासह एकूण ६७ लाख ५६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे या कारवाईसाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी सापळा रचून संशयित वाहन थांबवले असता त्यामध्ये प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि गुटख्याचा मोठा साठा आढळून आला.
या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर गुटखा तस्करीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभाग अशा संयुक्त मोहिमा राबवत आहेत.




