मुंबई: लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे, असे धुणी-भांडी करणाऱ्या महिलांनी सांगितले. त्यांच्या भावना ऐकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “ही योजना कधीही बंद पडणार नाही,” अशी ग्वाही दिली.
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील धुणी-भांडी काम करणाऱ्या २० महिलांनी “रसिकाश्रय” संस्थेच्या “जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी” या उपक्रमांतर्गत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
या भेटीत महिलांनी आपल्या अडचणी, रोजच्या संघर्षांचे अनुभव आणि लाडकी बहीण योजनेमुळे होणाऱ्या आर्थिक मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना दिलासा देत, या योजनेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
या कार्यक्रमात महिलांनी आपल्या व्यवसायासाठी अधिक मदत मिळावी, तसेच शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन व्हावे, अशी मागणी केली. यावेळी रसिकाश्रय संस्थेचे पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.




