घुग्घुस-मातारदेवी मार्गावर विद्युत खांब प्रकरण
चंद्रपुर : घुग्घुस शहर ते मातारदेवी, तडाली दरम्यान चौपदरी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, या महामार्गाच्या मधोमध महावितरण कंपनीचे विद्युत खांब उभे असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांचे अपघात वारंवार होत आहेत.
या समस्येची दखल घेत, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजुरेड्डी यांनी मुख्य अभियंता यांना दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी निवेदन सादर केले होते. त्यांनी तातडीने हे खांब हटवून मार्ग मोकळा करण्याची मागणी केली होती. परंतु, महावितरणकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. यामुळे स्थानिक जनतेच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
ठाम भूमिका:
आज, 14 जानेवारी 2025 रोजी राजुरेड्डी यांनी मुख्य अभियंता भटारकार यांना घटनास्थळी बोलावून सांगितले. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, येत्या आठवड्यात विद्युत खांब हटवले गेले नाहीत तर कोणत्याही अपघाताची जबाबदारी महावितरणवर राहील आणि मुख्य अभियंता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल.
या प्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, सुनील पाटील, शहशाह शेख, अंकुश सपाटे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाने त्वरित पाऊले उचलून ही समस्या सोडवावी, अशी जनतेची मागणी आहे. वेळेत कार्यवाही झाली नाही तर याचा परिणाम गंभीर होऊ शकतो.




