नागपूर: सोमलवाडा-मनीषनगर रेल्वे अंडरपास (आरयूबी) मुळे वर्धा रोडसाठी नवीन कनेक्टिव्हिटी निर्माण झाली आहे, ज्यामुळे मनीषनगर, बेसा आणि बेलतरोडी येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार इंद्रनील नाईक, आमदार कृपाल तुमाने, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, तसेच इतर अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “आधीच्या अंडरपासमुळे समस्या पूर्णपणे सुटल्या नव्हत्या, त्यामुळे नवीन प्रकल्पाची योजना आखण्यात आली. या अंडरपाससाठी देवेंद्रजींनी जागेची निवड केली आणि महामेट्रोला जबाबदारी दिली. आता तिसरा उड्डाणपूलही मंजूर झाला असून, तो थेट हॉटेल रेडिसनजवळ उतरणार आहे. यामुळे भविष्यात मनीषनगर, बेसा आणि बेलतरोडी येथील नागरिकांची अधिक सोय होईल.”
गडकरी यांनी पुढे सांगितले की, याठिकाणी आधी रेल्वे फाटक होते, ज्यामुळे नागरिकांना १७० रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीमुळे मोठा त्रास सहन करावा लागायचा. मात्र, नवीन अंडरपासमुळे हा त्रास दूर झाला आहे आणि वाहतूक अधिक सुगम झाली आहे.
नवीन अंडरपासमुळे नागपूरच्या शहर विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.




