अमरावती : सामाजिक न्याय विभाग यांच्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध योजना राबविण्यात येतात. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण की परीक्षा फी योजना, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजना राबविण्यात येतात. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी महाडीबीटी पोर्टलवरून नवीन ब नुतनीकरणाच्या अर्जांची ऑनलाईन स्वीकृती सुरू करण्यात आलेली आहे.
परंतु, सदर वर्षातील शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी सन 2023-24 वर्षातील अर्ज निकाली काढणे आवश्यक आहे. दि.19 सप्टेंबर, 2024 रोजीच्या महाडीबीटी डॅशबोर्डनुसार विद्यार्थी स्तरावर 1 हजार 47 तर महाविद्यालयस्तरावर 789 अर्ज महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती प्रवर्गाचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती अर्ज विहित मुदतीत जिल्हा कार्यालयाकडे पाठविणे अपेक्षित असते. असे असतानाही जिल्ह्यातील काही महाविद्यालयांनी ही बाब गांर्भीयाने घेतली नाही. सदर अर्ज मंजुरीसाठी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांच्याकडे सादर करण्याबाबत वेळोवेळी कळविण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले पात्र अर्ज जिल्हा लॉगिन वर पाठवावे. तसेच विद्यार्थ्यांनी लॉगिनकडे त्रुटी पूर्ततेसाठी परत केलेले अर्जाची संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून त्वरित त्रुटिपूर्तता करून पात्र अर्ज जिल्हा लॉगिन वर पाठविण्यात यावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र व्ही.जाधवर यांनी केले आहे.