Saturday, June 13, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

डिझेल टंचाईमुळे शेतकरी अडचणीत; खरीप हंगामावर संकटाची छाया, तात्काळ उपाययोजनांची मागणी

घुग्घुस, चंद्रपूर : पावसाळ्याच्या आगमनानंतर खरीप हंगामातील शेतीकामांना वेग आला असताना घुग्घुस व परिसरातील शेतकरी डिझेल टंचाईच्या गंभीर समस्येला सामोरे जात आहेत. नागरणी, वखरणी, रोटावेटरद्वारे मशागत तसेच पेरणीपूर्व तयारीसाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असताना अनेक पेट्रोल पंपांवर आवश्यक प्रमाणात डिझेल उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शेतामध्ये काम सुरू असताना ट्रॅक्टरचे डिझेल संपल्यास जवळच्या पेट्रोल पंपावरून कॅनमध्ये डिझेल मिळणे कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी पंप चालकांकडून कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने ट्रॅक्टर शेतातच बंद पडत आहेत. परिणामी शेतीची कामे खोळंबत असून पेरणी उशिरा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या खरीप हंगामाचा महत्त्वाचा टप्पा सुरू असून वेळेत मशागत आणि पेरणी न झाल्यास उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी मानसिक तणावाखाली असून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. शासनाच्या शेतकरी हिताच्या धोरणांनाही या परिस्थितीमुळे बाधा येत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

माजी उपसरपंच तथा शेतकरी सुधाकर बांदुरकर यांनी शासन आणि प्रशासनाकडे तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरसाठी पेट्रोल पंपांवर प्राधान्याने डिझेल उपलब्ध करून देण्याबरोबरच शेतीकामासाठी आवश्यकतेनुसार कॅनमध्ये डिझेल देण्याबाबत स्पष्ट निर्देश जारी करण्याची मागणी केली आहे.

तसेच महसूल, पुरवठा आणि कृषी विभागाने संयुक्तपणे परिस्थितीची पाहणी करून खरीप हंगामात डिझेल पुरवठा सुरळीत राहण्यासाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची गैरसोय करणाऱ्या संबंधितांवर योग्य कारवाई करावी, असेही त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांच्या मते, डिझेलचा प्रश्न तातडीने सोडविला गेला नाही तर खरीप हंगामावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News