नागपूर : इन्शुरन्स मार्केट, पेन्शन मार्केट आणि शेअर इकॉनमी हे देशाच्या आर्थिक विकासाचे महत्त्वाचे घटक असून, या तिन्ही क्षेत्रांतून आलेली गुंतवणूक उद्योग आणि व्यापाराच्या वाढीस मोठे योगदान देऊ शकते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
ते ‘मनी बी इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड’च्या वतीने आयोजित ‘अमृतकाल : विकसित भारत – 2047’ या तीन दिवसीय गुंतवणूकदार प्रशिक्षण परिषदेच्या समारोपप्रसंगी बोलत होते. ही परिषद 1, 2 व 8 फेब्रुवारी दरम्यान हॉटेल सेंटर पॉइंट, रामदासपेठ येथे पार पडली.
यावेळी ‘नवाब ऑफ दलाल स्ट्रीट’ म्हणून परिचित उद्योगपती रमेश दमाणी, मनी बीचे प्रबंध संचालक आशुतोष वखरे आणि संचालक शिवानी दाणी-वखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, देशाच्या आर्थिक वृद्धीसाठी गुंतवणुकीला चालना देणारी धोरणे महत्त्वाची आहेत. इन्शुरन्स आणि पेन्शन मार्केटमधील वाढती गुंतवणूक अर्थव्यवस्थेला बळ देईल. तसेच, शेअर बाजार हा केवळ सट्टा नसून योग्य ज्ञान आणि प्रशिक्षण घेतल्यास तो मोठ्या संधी निर्माण करू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या परिषदेच्या माध्यमातून गुंतवणुकीबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपस्थित गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी आपल्या अनुभवांचे आणि यशस्वी गुंतवणुकीच्या तंत्रांचे मार्गदर्शन केले.




