चंद्रपूर : वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील माजरी ते पळसगाव रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. तसेच, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शेतीचे क्षेत्र असल्याने आणि वन्य प्राण्यांची दहशत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

याच पार्श्वभूमीवर, भारतीय जनता युवा मोर्चा भद्रावती तालुक्याचे सचिव कुलदीप नामदेव मन्ने यांनी ३१ जानेवारी रोजी वरोरा-भद्रावतीचे आमदार करण देवतळे यांना निवेदन सादर केले. त्यांनी त्वरित रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी करत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आवाहन केले.
पळसगावातील अनेक नागरिक आपल्या उपजीविकेसाठी बाहेरगावी जात असतात, मात्र खराब रस्त्यांमुळे त्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अतिशय धोकादायक ठरत आहे. भविष्यात मोठ्या दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने या मागणीची त्वरित दखल घ्यावी आणि रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.




