अमरावती : ऑलिंपिकवीर स्वर्गीय खाशाबा जाधव यांचा जन्मदिन दि. 15 जानेवारी ‘राज्य क्रीडा दिन’म्हणून नुकताच साजरा करण्यात आला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिला क्रीडा अधिकारी कार्यालय व एकविध खेळ संघटना अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे साजरा करण्यात आला.
राज्य क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याअंतर्गत आयोजित मॅरेथॉनला जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी संदीप इंगोले, क्रीडा अधिकारी संजय पांडे यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. यावेळी खेळाडूंनी उत्साहात रॅलीमध्ये सहभाग घेतला व राज्य कीडा दिनाच्या घोषणा दिल्या. तसेच कुस्ती, धर्नुविद्या, तलवारबाजी, बॅडमिंटन, टेनिस व्हॉलीबॉल या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
कृषक विद्यालय, निभोंरा, शिवाजी हायस्कूल, मोर्शी, पब्लिक स्कुल, चांदुर बाजार, एकलव्य गुरुकुल स्कूल, नांदगाव खंडेश्वर, यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी राज्य क्रीडा दिनानिमित्य कार्यक्रम घेण्यात आले. तसेच खाशाबा जाधव जन्म दिनानिमित्त आयोजित स्पर्धातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना मेडल, शिल्ड व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.




