अमरावती : जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या अध्यक्षतेखाली नव संजीवनी तसेच गाभा समिती सभा चिखलदरा तालुका आरोग्य प्रशिक्षण केंद्र येथे नुकतीच घेण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता माहपात्र, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.सौंदळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा आकांक्षित तालुका नोडल अधिकारी बालासाहेब बायस आदी यावेळी उपस्थित होते. आकांक्षित तालुक्याअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांस यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला. यावेळी आरोग्य, पोषण, शिक्षण, घरकूल योजना, पाणी, जलसंधारण, मिशन १०० दिवस विकास या विषयावर आढावा घेऊन पुढील उपाययोजना राबविण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले.
अविकसित व मागास जिल्ह्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या नीती आयोगामार्फत देशव्यापी आकांक्षित तालुका कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यांतर्गत संबंधित भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येतात. याबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.
गाभा समिती बैठकीअंतर्गत आदिवासी भागातील कुपोषण, बालमृत्यू ,
मातामृत्यू यावर करण्यात येणाऱ्या उपाय योजना, रोजगार निर्मिती, आरोग्य सेवा आणि मुलभूत सुविधा यांचा आढावा घेण्यात आला. तसेच मिशन २८ अंतर्गत केले जाणारे काम, ग्राम बाल विकास केंद्रांवरील सद्यस्थिती याबाबतही आढावा घेण्यात आला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, चिखलदरा गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे, धारणी गटविकास अधिकारी जीवनलाल भिलावेकर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.प्रवीण पारिसे तसेच जिल्हा व तालुकास्तरावरील सबंधित विभाग प्रमुख, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.




