यवतमाळ : अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढविणे व ऊर्जा संवर्धन करणे या बाबींना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह दि.१४ ते २० डिसेंबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये हा सप्ताह साजरा करून या ऊर्जेबाबत जनजागृती केली जाणार आहे.
नवीन व नवीकरणीय ऊर्जा तसेच ऊर्जा बचतीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आजही जवळपास ६० टक्के पेक्षा जास्त ऊर्जा निर्मिती ही औष्णिक ऊर्जा निर्मिती पध्दतीने केली जाते. पारंपरिक पध्दतीने ऊर्जा निर्मिती करतांना पर्यावरणामध्ये ग्रीन हाऊस गॅसेस सोडले जातात यामध्ये CO₂, CH4, N₂O, HFC६, PFCS, SF६, यांचा अंतर्भाव असतो. या वायुंचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असून जागतिक उष्णतामान वाढत आहे. पारंपरिक ऊर्जा निर्मितीचे स्त्रोत सिमीत असल्याने सद्यः स्थितीत नित्यनूतनशील ऊर्जा व ऊर्जा बचतीशिवाय पर्याय नाही तसेच ही ऊर्जा प्रदूषण विरहित आहे.
यावर्षी दि.१४ ते २० डिसेंबर या दरम्यान राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह निमित्त जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग व जनजागृती होण्यासाठी कार्यक्रम घेतले जात आहे. तसेच भविष्यात निर्माण होऊ घातलेल्या ऊर्जा संकटाबाबत जनतेमध्ये जागृती करणे व अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापराविषयी प्रबोधन होण्याकरिता प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांकडून ऊर्जा बचत संबंधीचे संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यात यावेत, असे आवाहन महाऊर्झाच्या विभागीय महाव्यवस्थापकांनी केले आहे.




