घुग्घुस, चंद्रपुर : आज दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत पांढरकवडा येथे सेवा कार्ड कॅम्प यशस्वीपणे आयोजित करण्यात आला.
या कॅम्पमध्ये विनोद रामटेके (पशुवैद्यकीय अधिकारी) यांनी नोडल अधिकारी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान – पांढरकवडा म्हणून जबाबदारी पार पाडली. कॅम्पला ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, सामुदायिक आरोग्य अधिकारी, ए.एन.एम., अंगणवाडी सेविका तसेच आशा सेविका यांची उपस्थिती होती.
कॅम्पदरम्यान ग्रामस्थांना विविध शासकीय सेवा कार्ड उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, ई-श्रम कार्ड तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत विविध शासकीय योजनांचे अर्ज स्वीकारण्यात आले.
या सेवा कार्ड कॅम्पचा ग्रामपंचायत पांढरकवडा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. शासनाच्या विविध योजना व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना थेट लाभ मिळत असून शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रभावी अंमल होत असल्याचे चित्र दिसून आले.




