इंडिगो विमानसेवेच्या उड्डाणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमिततेमुळे देशभरातील हवाई प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. आज मुंबई आणि दिल्ली विमानतळावरून 220 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सततच्या विस्कळीत वेळापत्रकामुळे निर्माण झालेल्या असंतोषानंतर इंडिगोने लवकरच सेवा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले असून, पंधराशेहून जास्त उड्डाणे नियमित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कंपनीने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने कडक भूमिका घेत इंडिगो विमान कंपनीला स्पष्ट निर्देश दिले आहेत की रद्द झालेल्या किंवा व्यत्यय आलेल्या उड्डाणांमुळे नुकसान झालेल्या सर्व प्रवाशांचे पैसे आज रात्री आठ वाजेपर्यंत परत केले जावेत. तसेच, उड्डाणे रद्द किंवा विलंबित झाल्याने प्रवाशांपासून वेगळे झालेल्या सर्व सामानाची पुढील 24 तासांत परतफेड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रवाशांच्या तक्रारी सहजतेने हाताळण्यासाठी आणि परतफेडीची प्रक्रिया जलद करण्यासाठी इंडिगोने स्वतंत्र सुविधा कक्ष सुरू करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. या कक्षांमार्फत थेट प्रभावित प्रवाशांशी संपर्क साधून तक्रारी व परतफेडीची प्रक्रिया तातडीने सुरू केली जाणार आहे.
हवाई वाहतूक विस्कळीत झाल्याने तणाव वाढलेल्या परिस्थितीत भारतीय रेल्वेने मोठा दिलासा देत एकूण 89 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. पुढील दोन दिवसांत विविध मार्गांवर या गाड्या धावणार आहेत.
मध्य रेल्वे अंतर्गत पुणे–बेंगळुरू, पुणे–दिल्ली आणि मुंबई–दिल्लीसह १४ विशेष गाड्या धावतील.
पश्चिम रेल्वे विभागातून भिवानी–मुंबई आणि मुंबई–शकुरबस्ती यांसह ७ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
दक्षिण मध्य रेल्वे विभागात चेरलापल्ली–शालीमार, सिकंदराबाद–चेन्नई एगमोर आणि हैदराबाद–मुंबई अशा ३ विशेष गाड्यांचे संचालन केले जाईल.
हवाई वाहतूक विस्कळीत झाल्याने अडकलेल्या हजारो प्रवाशांना रेल्वेच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




