चंद्रपूर – बिनबा गेट परिसरातील राजनूर सेलिब्रेशन जवळील दुकानावर चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने कारवाई करून तब्बल १५० किलो प्लास्टिक जप्त केले. याशिवाय प्लास्टिकचा साठा करणाऱ्या दुकानदाराकडून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई सदर व्यावसायिकावर प्रथमच करण्यात आली आहे.
मनपा उपद्रव शोध पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. संबंधित दुकानदारास कठोर ताकीद देण्यात आली असून, पुन्हा गुन्हा आढळल्यास १० हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मनपा हद्दीत प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यासाठी सातत्याने कारवाई सुरू असून, प्लास्टिक साठ्याबाबत गुप्त माहिती देणाऱ्यास ५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून मनपाकडे गुप्त माहिती पोहोचत आहे.
राज्यात १ जुलै २०२२ पासून एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तूंवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार, उल्लंघन करणाऱ्यांना दंडासोबतच ३ महिन्यांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
ही कारवाई आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात, डॉ. अमोल शेळके, भुपेश गोठे, शुभम खोटे, शुभम चिंचेकर, राहुल गगपल्लीवार व पूनम समुद्रे यांनी केली.





