चंद्रपूर : श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा प्रशासनाच्या वतीने “श्री गणेश आरोग्य अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2025 दरम्यान शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या ठिकाणी सामुदायिक आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
या शिबिरांमधून नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, तज्ज्ञांचा वैद्यकीय सल्ला, आयुष्यमान कार्ड काढणे तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती उपलब्ध होणार आहे.
या निर्णयासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीला डॉ. हेमचंद कन्नाके, डॉ. निवृत्ती जिवने, डॉ. मौहनिश गिरी, डॉ. भूषण जैन, डॉ. रुपेश कुमारवार, डॉ. इंद्रजीत किल्लेदार, डॉ. कविश्वरी कुंभलकर यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिबिरांत सहभागी गणेश मंडळे :
- चंद्रपूरचा राजा गणेश मंडळ
- जोड देऊळ गणेश मंडळ, पठाणपुरा
- रेणुका माता गणेश मंडळ, भानापेठ
- युवक गणेश मंडळ, गंजवार्ड
- श्री हिवरपुरी सर्वोदय सार्वजनिक गणेश मंडळ
- जय हिंद गणेश मंडळ, बालाजी वॉर्ड
डॉ. चिंचोळे यांनी सांगितले की, “गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर नागरिक मंडपांना भेट देतात. त्यावेळी थेट लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवून आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.”
शिबिरांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आधारकार्ड तसेच शासकीय आरोग्य योजनांशी संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. यावेळी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री आरोग्य योजना यांसह इतर उपयुक्त योजनांची माहितीही देण्यात येणार आहे.





