गोंदिया – गोंदिया शहर, गोंदिया ग्रामीण, रामनगर आणि रावणवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त व बेवारस अवस्थेत असलेल्या एकूण 118 वाहनांचा लिलाव नुकताच पार पडला. यामध्ये 117 मोटारसायकली आणि 1 चारचाकी वाहनांचा समावेश असून ही सर्व वाहने भंगार स्थितीत पोलिस ठाण्यांमध्ये पडून होती.
लिलावासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर, पोलीस मुख्यालय, कारंजा गोंदिया येथे लिलाव प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेमध्ये एकूण 53 व्यावसायिकांनी सहभाग घेतला. आरटीओ विभागामार्फत या वाहनांची एकूण मूल्यांकन रक्कम 1,03,450 रुपये इतकी निश्चित करण्यात आली होती.
लिलाव प्रक्रियेदरम्यान भंडारा येथील व्यावसायिक कलाम हनीफ खान यांनी सर्वाधिक 6,91,000 रुपयांची बोली लावत संपूर्ण 118 वाहने विकत घेतली. ही रक्कम मूल्यांकनाच्या तुलनेत अनेक पटीने अधिक असून, यामुळे पोलिस विभागाला आर्थिकदृष्ट्या चांगला फायदा झाला आहे.
पोलीस विभागाच्या या उपक्रमामुळे जप्त वाहनांचा निपटारा करण्यात यश मिळाले असून, पोलिस ठाण्यांमधील जागाही मोकळी झाली आहे.