नागपूर : भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI), खाण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली देशातील प्रमुख भूविज्ञान संस्था, आज आपला १७५वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहे.
मध्य क्षेत्र, नागपूर येथे या ऐतिहासिक क्षणाचा उत्सव अतिरिक्त महासंचालक आणि विभागप्रमुख दिनेश व्ही. गणवीर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्साहात सहभाग घेतला.
आजच्या विशेष कार्यक्रमांतर्गत “GSI सोबत चालूया” या संकल्पनेखाली वॉकेथॉन चे आयोजन करण्यात आले. यामध्ये GSI अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वॉकेथॉनद्वारे पर्यावरण जतन आणि भूवैज्ञानिक जागरूकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी GSI च्या योगदानावर प्रकाश टाकण्यात आला आणि संस्थेच्या भविष्यातील दिशेवर विचारमंथन करण्यात आले. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या सातत्यपूर्ण योगदानामुळे देशाच्या खनिज संसाधनांच्या शोध आणि व्यवस्थापनाला मोठी चालना मिळाली आहे.
संस्थेच्या १७५ वर्षांच्या प्रवासाचा गौरव करण्यासाठी विविध उपक्रम आणि परिसंवादांचेही आयोजन करण्यात आले आहे.