8 मार्चपूर्वी कर भरणा करण्याचे मनपाचे आवाहन
चंद्रपूर: महानगरपालिकेकडून शहरातील थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहिम सुरू असून, 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कर थकीत असलेल्या मालमत्ताधारकांना 8 मार्चपर्यंत कर भरण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे. अन्यथा, 10 मार्च रोजी त्यांच्या नावांची सार्वजनिकपणे घोषणा करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा चंद्रपूर महानगरपालिकेने दिला आहे.
शहरातील नागरी सुविधा अबाधित ठेवण्यासाठी मनपाने मालमत्ता कर आकारणी केली असली, तरी अनेक नागरिक कर भरण्यात टाळाटाळ करीत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे थकबाकीदारांवर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी प्रथम समज देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कर विभागातील अधिकारी व कर्मचारी थकबाकीदारांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून कर भरण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.
नामजाहीर करण्याची तयारी
1 लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांनी दिलेल्या मुदतीत कराचा भरणा न केल्यास, त्यांच्या नावांची यादी विविध माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल. या कारवाईमुळे सार्वजनिक प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो, याची जबाबदारी संबंधित थकबाकीदारांचीच राहील, असे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.
या मोहिमेमुळे अनेक नागरिकांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने कर भरायला सुरुवात केली आहे. तरीही संभाव्य कारवाई टाळण्यासाठी थकीतदारांनी त्वरित कर भरणा करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.