नागपूर: आदिवासी भागांमधील सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण दूर करणे हे सर्वांत मोठे आव्हान असून, या दिशेने सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. आदिवासीबहुल जिल्ह्यांचा विकास हा सरकारच्या प्राधान्यक्रमात सर्वोच्च स्थानी आहे. मात्र, केवळ सरकारी प्रयत्न पुरेसे नसून सर्वसमावेशक विकासासाठी समाजाच्या सर्व स्तरांमधून सामूहिक योगदान आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
एम्स, नागपूर येथे ‘आंतरराष्ट्रीय फिस्ट २०२५’ परिषदेचे आयोजन
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आंतरराष्ट्रीय फिस्ट २०२५’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या वेळी विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), एम्स नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी, तसेच परिषदेचे संयोजक डॉ. संजीव चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
गडकरी यांनी आरोग्य, शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आदिवासी भागांचा विकास करण्याच्या गरजेवर भर दिला. सरकार विविध योजना राबवत असले तरी, त्या योजनांचा फायदा प्रत्यक्षात जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
ही परिषद वैद्यकीय संशोधन, तंत्रज्ञान आणि आरोग्यविषयक नवकल्पनांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ यात सहभाग घेऊन विविध विषयांवर चर्चा करणार आहेत.




