नागपूर: नागपूर महानगरपालिका (NMC) ने शहरातील सिवर आणि गटार लाईन स्वच्छतेसाठी शंभर टक्के यांत्रिकी पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, गटार सफाईसाठी आता कोणत्याही प्रकारचे मनुष्यबळ वापरण्यात येणार नाही.
गेल्या काही वर्षांत गटार सफाईदरम्यान होणाऱ्या दुर्घटनांमध्ये वाढ झाली होती. याच पार्श्वभूमीवर, नागपूर महानगरपालिकेने अत्याधुनिक सक्शन कम जेटिंग मशीनच्या मदतीने गटार सफाई करण्याचे ठरवले आहे. या मशीनच्या सहाय्याने चोकअप झालेल्या सिवर लाईन्स आणि गटारांना जलद आणि सुरक्षित पद्धतीने स्वच्छ करता येणार आहे.
तक्रारींवर त्वरित कारवाई
शहरातील गटार चोकअपच्या तक्रारी प्राप्त होताच, महानगरपालिकेचे यंत्रणेच्या मदतीने लगेच उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामुळे नागरीकांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षितता सुनिश्चित होणार असून, नागपूर शहर अधिक स्वच्छ आणि सांडपाणी व्यवस्थापन अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.




