बीड: ‘ज्ञानराधा मल्टीस्टेट’ च्या ठेवीदारांना न्याय मिळावा आणि त्यांच्या ठेवी लवकरात लवकर परत मिळाव्यात, या मागणीसाठी ठेवीदार कृती समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व ठेवीदार कृती समितीचे प्रमुख प्रा. संदीप उबाळे यांनी केले. त्यांनी सांगितले की, अनेक ठेवीदारांना ऑनलाइन अर्ज भरता येत नाहीत, त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या ऑफलाइन अर्जाची स्वीकृती द्यावी. तसेच, ठेवीदारांना त्यांच्या गुंतवलेल्या ठेवी लवकर मिळाव्यात, यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.
मोर्चात मोठ्या संख्येने ठेवीदारांनी सहभाग घेतला. त्यांनी प्रशासनाकडून त्वरित ठोस कारवाईची मागणी केली. या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. ठेवीदारांच्या मागणीकडे प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




