यवतमाळ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांस अण्णाभाऊ साठे प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती वितरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महामंडळाच्या जिल्हा कार्यालया मार्फत सरासरी 60 टक्क्यांच्यावर 10वी, 12वी, पदवी, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी, विद्यार्थीनींना महामंडळाकडून अनुक्रमाने आलेल्या प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोस्ताहनपर शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे.
मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी, विद्यार्थीनींनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पळसवाडी कॅम्प, दारव्हा रोड यवतमाळ येथे दि.25 जुलैपर्यंत अर्ज सादर करावे. उशिरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी कळविले आहे.




