मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विविध महत्वाकांक्षी योजनांचा आढावा वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते.
अर्थसंकल्पात समाविष्ट व महत्वाकांक्षी ७ योजनांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हास्तरावर प्रत्येक योजनेसाठी समन्वय अधिकारी नियुक्त करा. या योजनांचा दर आठवड्याला आढावा घेण्यात येईल. त्यासाठी लाभार्थ्यांच्या याद्या तयार कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रमासाठी शासकीय, विविध प्राधिकरणे, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे आदी विभागांनी पात्र उमेदवारांची नोंदणी करून, त्यांना पात्रतेनुसार या योजनेत सामावून घेतल्यास उमेदवारांना या योजनेतील विद्यावेतन देणे शक्य होईल.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या पोर्टलचे अनावरण करण्यात आले. https://rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर उमेदवारांना आणि उद्योग- व्यवसायांना, आस्थापनांना नोंदणी करता येणार आहे.
मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण योजनेत नोंदणी करताना भगिनींची अडवणूक होऊ नये यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष ठेवावे. नोंदणी करतानाच्या अडचणी दूर कराव्यात. अर्जांची पात्रता निश्चित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
शासन गोरगरीब, सर्वसामान्यांना लाभ मिळावा यासाठी योजना राबवत असते. अशा घटकांकडून पैसे काढणे हे योग्य नाही, त्यामुळे योजनांच्या अमंलबजावणीत गैरप्रकार झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असे कठोर इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठकीत दिला.
विशेषतः मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण योजनेत कुणी पैशांची मागणी केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करा. अशांना केवळ निलंबित न करता त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन तुरुंगात पाठवा. असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.