घुग्घुस (चंद्रपुर) : आज दिनांक 28/05/2024 रोजी नगरपरिषद घुग्घुस द्वारे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करून लावण्यात आलेले सुमारे 62 आस्थापना हटविण्यात आले. पोलीस बंदोबस्ताखाली ही कारवाई करण्यात आली. मागील सहा महिन्यांपासून नगरपरिषद घुग्घुस द्वारे सर्व अतिक्रमण धारकांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यासाठी वारंवार नोटीस देण्यात आली होती व मागील दोन दिवसांपासून जाहीर दवंडी देण्यात आली होती.
नगरपरिषदेच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अर्ध्यापेक्षा अधिक अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले परंतु शिल्लक अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नगरपरिषद घुग्घुसच्या यंत्रणे द्वारा काढण्यात आले.
यापूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद होऊन सतत वाहतुकीची कोंडी व अपघाताच्या घटना घडत होत्या. सदर चौकामधून वणी, यवतमाळ, घुग्घुस शहर, नकोडा, ACC कंपनी, लॉयडस कंपनीचे असे हजारो वाहने दररोज जातात. नवीन ग्रामीण रुग्णालय, बसस्थानकाचे लोकार्पण झाल्यानंतर या वाहतुकीमध्ये अधिकच भर पडणार आहे. त्यामुळे सदरचे अतिक्रमण हटविणे अतिशय आवश्यक होते. त्याचप्रमाणे नगरपरिषद घुग्घुस कडून या चौकामध्ये ट्रॅफिक सिग्नल, सौंदर्यीकरण व सुशोभीकरण ही कामे प्रस्तावित आहेत.
सदर कार्यवाहीच्या दरम्यान नगर परिषद घुग्घुस चे मुख्याधिकारी डॉ. जितेंद्र गादेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर सुधाकर यादव, पोलीस निरीक्षक घुग्घुस सोनटक्के, पोलीस निरीक्षक पडोली चतरकर, नायब तहसीलदार सचिन खंडाळे, यांच्यासह नगर परिषद अधिकारी, कर्मचारी व पोलीस कर्मचारी, मंडळ अधिकारी व तलाठी घुग्घुस उपस्थित होते.